अंक दिसत नसल्यास...

खालील लिंकवरून flashplayer फ्री डाऊनलोड करा.इन्स्टॉल करा. http://downloadflashplayer.org/ अंक दिसू लागेल.

झूम करून वाचण्याकरिता अंकावर दोनदा क्लीक करा :

___________________________________________________

Saturday, December 25, 2010

*कविता-रती* दिवाळी २००९



एका मासिकाची चळवळ _आशुतोष पाटील

‘कविता- रती’चा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाला. हा मराठी साहित्याच्या विस्ताराचा काळ होता. स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे बहुजन, दलित व स्त्रिया अशा समाजाच्या विविध स्तरांमधून अभिव्यक्ती आकांक्षांचा रेटा वाढत चालला होता. त्यातूनच दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी या वाङ्मयप्रवाहांचा उदय या काळात झाला. आजवर मराठी वाङ्मयविश्वाच्या परिघात समाविष्ट होऊ न शकलेली मनं व्यक्त होण्याची धडपड करू लागली. त्यातील बहुतेकांची पहिली अभिव्यक्ती कविता हीच होती. समाजाच्या विविधांगांतून अनेक कवी या सुमारास पुढे येत होते. मात्र त्यांच्या कवितेला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसं समर्थ माध्यम या काळात उपलब्ध नव्हतं. ती कमतरता ‘कविता-रती’नं भरून काढली.

1982 मध्ये ‘सत्यकथे’चा अस्त झाला. लघुनियकालिकं फार मोठा पल्ला गाठू शकली नाहीत. विशिष्ट कवी आणि विशिष्ट काव्यजाणिवा यांच्यापुरती ती मर्यादित राहिली. दलित साहित्याचं व्यासपीठ म्हणून ‘अस्मितादर्श’ या काळात जोमानं कार्य करत होतं. ‘अनुष्टुभ’ची पायाभरणी सुरू होती. ‘आलोचना’नं समीक्षेसाठी मौलिक कार्य करण्याची भूमिका आखून घेतली होती. अशा परिस्थितीत नव्या काव्योर्मीना बळ पुरवणा-या नियतकालिकाचा अभाव जाणवत होता. हे जाणून पुरुषोत्तम पाटील यांनी धुळ्याहून ‘कविता- रती’चा आरंभ केला.


‘कविता- रती’चा पहिला अंक 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रसिद्ध झाला. हा मराठी साहित्याच्या विस्ताराचा काळ होता. स्वातंत्र्योत्तर काळात उपलब्ध झालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे बहुजन, दलित व स्त्रिया अशा समाजाच्या विविध स्तरांमधून अभिव्यक्ती आकांक्षांचा रेटा वाढत चालला होता. त्यातूनच दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी या वाङ्मयप्रवाहांचा उदय या काळात झाला. आजवर मराठी वाङ्मयविश्वाच्या परिघात समाविष्ट होऊ न शकलेली मनं व्यक्त होण्याची धडपड करू लागली. त्यातील बहुतेकांची पहिली अभिव्यक्ती कविता हीच होती. समाजाच्या विविधांगांतून अनेक कवी या सुमारास पुढे येत होते. मात्र त्यांच्या कवितेला वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसं समर्थ माध्यम या काळात उपलब्ध नव्हतं. ती कमतरता ‘कविता-रती’नं भरून काढली.


पुरुषोत्तम पाटील हे स्वत: कवी असल्यानं त्यांच्या मनात कवितेसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी होतीच. शिवाय ‘अनुष्टुभ’च्या संपादनाचा अनुभव गाठीशी होता. या भांडवलावर केवळ ‘काव्य आणि काव्यसमीक्षा’ यांना वाहिलेल्या नियतकालिकाला त्यांनी प्रारंभ केला. वाङ्मयीन नियतकालिकाचा डोलारा सांभाळताना करावी लागणारी सर्वप्रकारची कसरत ते आजतागायत करत आहेत. ‘कविता- रती’साठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत वा अनुदान त्यांनी घेतलेलं नाही. वर्गणीदार आणि असंख्य हितचिंतक यांच्या बळावर हे नियतकालिक सुरू आहे.


शिवाय धुळ्यासारख्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यातील गावातून हे नियतकालिक चालवताना अनेक समस्यांना सामारं जावं लागलं. लेखनिक, कारकून, मुद्रितशोधक, शिपाई आणि पाकिटांना तिकिटं लावणं, अंक पाकिटात घालून टपालात पाठवणं अशी सर्व प्रकारची कामं ते स्वत:च करत आले आहेत. मधल्या 1993 ते 1996 या काळात ‘कविता- रती’वर संकट कोसळलं. काही अंक प्रकाशित होऊ शकले नाहीत. अंकांच्या प्रकाशनात अनियमितता आली; पण त्यातूनही ‘कविता- रती’ सावरलं. पुरुषोत्तम पाटील यांनी नेटानं आणि निष्ठेनं केलेली वाटचाल आज पंचवीस वर्षाची झालेली आहे.


पुरुषोत्तम पाटील हे स्वत: सौंदर्यवादी जाणीवेचे कवी आहेत; परंतु ‘कविता- रती’चं संपादन करताना त्यांनी काव्यविषयक खुला आणि व्यापक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. कोणत्याही विशिष्ट काव्यविषयक भूमिकेशी वा संप्रदायाशी बांधून न घेता कवितेचं ‘कवितापण’ महत्त्वाचं मानणारी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे मराठीतले सर्व प्रवाह, गटतट, संप्रदाय, प्रस्थापित, बंडखोर, नवोदित अशा सर्वाना सामावून घेण्याचं काम ‘कविता-रती’नं केलं आहे. फक्त चांगल्या आणि चांगल्याच कविता हाच एकमेव निकष मानल्यानं तमाम मराठी कवींचे आग्रह-दुराग्रह इथं गळून पडतात. ‘कविता-रती’मध्ये आपली कविता छापून यावी असं सर्वच कवींना वाटतं. छापून आलेल्या कवितेचं भूषण वाटतं. त्यामुळे कवितेच्या प्रांतात एक निकोप आणि चैतन्यमय वातावरण निर्माण करण्याचा ‘कविता-रती’चा प्रयत्न अतिशय स्तुत्य म्हणावा असाच आहे. कुठलाही दावा न करता आणि कुठलीही भूमिका न घेता पुरुषोत्तम पाटील यांनी ‘कविता-रती’च्या माध्यमातून एका साहित्यिक चळवळीची उभारणी केली आहे. आणि तीही एकटय़ाच्या बळावर!


द. भा. धामणस्कर, रजनी परुळेकर, नारायण कुलकर्णी- कवठेकर, वसंत पाटणकर, निरंजन उजगरे, फ. मुं. शिंदे, अनुराधा पाटील, खलील मोमीन, नीळकंठ महाजन, अरुणा ढेरे, शैला सायनाकर, इंद्रजित भालेराव, प्रियदर्शन पोतदार, दासू वैद्य, अशोक कोतवाल, प्रकाश विठ्ठल किनगावकर, केशव सखाराम देशमुख, सुहास जेवळीकर, श्रीकांत देशमुख, रेणू दांडेकर, प्रवीण बांदेकर, हेमंत दिवटे, व्रजेश सोळंकी, विरधवल परब, मंगेश नारायणराव काळे, ऐश्वर्य पाटेकर, संतोष पद्माकर पवार, गणेश दिसपुते, प्रज्ञा दया पवार, आदी गेल्या तीन दशकांत नावारूपास आलेल्या कवींनी ‘कविता- रती’ मधून हजेरी लावली आहे.


‘कविता- रती’तून आलेले काव्यसमीक्षात्मक लेखनही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यात कवितासंग्रहांची परीक्षणं, कविविमर्शात्मक लेख, काव्यविषयक चर्चा आणि कवितांची मर्मग्रहणे या प्रकारच्या लेखनाचा प्रामुख्यानं समावेश होतो. नवोदित कवींच्या पहिल्याच संग्रहाचं परीक्षण देण्यावर ‘कविता- रती’नं भर दिला आहे. कवितांची आकलनं, आस्वाद या धर्तीचं ‘कविता- रती’तून आलेलं लेखन वैशिष्टय़पूर्ण ठरतं. कवितेच्या आशय, रूप आणि भाषिक या तिन्ही अंगांचा वेध घेणारी ही समीक्षा आहे. बहुविध जाणिवांच्या चांगल्या कवितेसोबतच मर्मग्राही काव्यसमीक्षा देऊन ‘कविता- रती’नं मराठी काव्यसंस्कृतीला व्यापकतेप्रमाणेच सबोलतेचंही परिमाण प्राप्त करून दिलं आहे. त्यात विशेषांकांनी मौलिक भर घातली आहे. आजपर्यंत एकूण तेरा विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. कुसुमाग्रज, बालकवी, वा. रा. कान्त, इंदिरा संत, बा. भ. बोरकर, विंदा करंदीकर या कवींच्या काव्यावरील चिकित्सक लेखनाने संपन्न असणारे विशेषांक जसे आहेत, तसेच म. सु. पाटील, रा. ग. जाधव या काव्यसमीक्षकांच्या लेखनाची मीमांसा करणारे विशेषांकदेखील ‘कविता- रती’नं प्रसिद्ध केलेले आहेत. मराठी काव्यसमीक्षेची समृद्धता वृद्धिंगत करण्यासाठी ‘कविता- रती’नं उचललेला वाटा मोलाचा आहे.


आपलं संपूर्ण आयुष्य कवितेसाठी समर्पित करून वयाच्या 83व्या वर्षीही कवितेच्या ध्यासानं अस्वस्थ असलेल्या संपादक पुरुषोत्तम पाटील यांनी आधुनिक मराठी कवितेच्या गेल्या पाव शतकाच्या वाटचालीत ‘कविता- रती’च्या रूपानं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. वैयक्तिक पातळीवर केल्या जाणाऱ्या कामालाही चळवळीचं रूप कसं येऊ शकतं, याचा जणू आदर्शच त्यांनी उभा केला आहे.

आज एकविसाव्या शतकात, माध्यमांच्या गर्दीत कवितेला प्राप्त होणारं बाजारूपण, गटातटांच्या संकुचित चौकटीत अडकून पडलेली कविता, प्रसिद्धी व यश यांच्या हव्यासापायी काव्यसाधनेचा वाढता अभाव, हे सारं भोवतालचं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. अशा पर्यावरणात कवितेसंबंधी खुला, व्यापक दृष्टिकोन स्वीकारून कार्य करणारं ‘कविता- रती’सारखं नियतकालिक अपरिहार्य आणि अनिवार्य आहे.
(दै.प्रहार_दि.१९ डिसेंबर २०१० वरून साभार)

काव्यमय रौप्यमहोत्सव! : संजय झेंडे

कविता-रती या कवितेला वाहिलेल्या वाङ्मयीन नियतकालिकाचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने...


खानदेशला वाङ्मयीन परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. क्रांतीची तुतारी फुंकणारे केशवसुत, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बहिणाबाई, बा. सी. मढेर्कर, साने गुरुजी ही या परंपरेतील नावे. या प्रतिभाशाली काव्याविष्काराची जोपासना करणाऱ्या वाङ्मयीन नियतकालिकांची उपलब्धी हे खानदेशच्या साहित्यविश्वाचे अनोखे वैशिष्ट्य ठरू शकते. नारायण नरसिंह फडणीस यांचे काव्यरत्नावली आणि आर्यावर्त, प्रबोध, खानदेश वैभव, प्रभात, प्रबोध चंदिका या नियतकालिकांचा यासंदर्भात प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या नियतकालिकांचा वारसा चालविणाऱ्या किंबहुना या परंपरेची पताका एकविसाव्या शतकात फडकाविणाऱ्या प्रा. पुरुषोत्तम पाटील यांच्या 'कविता-रती' या द्वैमासिकाने गाठलेली पंचविशी खानदेशातीलच नव्हे, तर राज्याच्या साहित्यविश्वात ऐतिहासिक घटना ठरावी.

' कविता-रती' म्हणजे प्रा. पुरुषोत्तम पाटील यांना खानदेशचे 'संपादक श्री.पु.' हे बिरुद चिकटण्यास निमित्त ठरले ते नियतकालिक . सन १९८५च्या नोव्हेंबरमध्ये कविवर्य बा. भ. बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सुरू झालेला कविता-रतीचा प्रवास बोरकरांच्या शताब्दीवर्षापर्यंत सुरू आहे. त्यामुळे यंदा कविता-रतीचा दिवाळी अंक 'बा. भ. बोरकर विशेषांक' असणार आहे. शासनाचे कोणतेही अनुदान नाही, राजकीय व्यक्ती अथवा शैक्षणिक-सहकारी संस्थांचे भरभक्कम पाठबळ नाही, केवळ वर्गणीदार आणि मोजके जाहिरातदार यांच्या पाठिंब्यावर सुरू असलेला संसार हे 'कविता-रती'चे आणखी एक वैशिष्ट्य. प्रा. पाटील यांनी वयाच्या ५८व्या वषीर् व्रतस्थपणे साहित्य शारदेच्या दरबारात रुजू केलेली सेवा, वयाच्या ८३ वषीर् पायांना दुखापत झालेली असताना, श्रवणशक्ती क्षीण झालेली असतानाही सुरू ठेवली आहे.

अर्थात, केवळ काव्य आणि काव्यसमीक्षेला वाहिलेले नियतकालिक प्रदीर्घ काळ प्रकाशित करणं, याचं कविता-रती हे काही एकमेव नियतकालिक ठरु शकत नाही. खानदेशातच अशी परंपरा निर्माण करण्याचा बहुमान 'काव्यरत्नावली' या सन १८८७ ते १९३५ या कालखंडा प्रकाशित होणाऱ्या द्वैमासिकास दिला जातो. नारायण नरसिंह उर्फ नाना फडणीस यांनी जळगाव येथून प्रकाशित केलेल्या काव्यरत्नावलीमध्ये साधारण ५० वर्षांच्या कालखंडात सुमारे दोन लाख कविता प्रकाशित केल्याचे सांगितले जाते. काव्यरत्नावलीच्या योगदानाची दखल घेताना आचार्य प्र. के. अत्रे म्हणाले होते, 'प्राचीन मराठी काव्याचे पुनश्चरण आणि संकीर्तन गोदावरीच्या नि चंदभागेच्या काठी झाले असले तरी आधुनिक मराठी कवितेचे संवर्धन तापी तीरावर झाले आहे'. खानदेशचं लेणे ठरावी अशी ही परंपरा १०० वर्षांनंतर पांझरेच्या तीरावर पुनरुज्जीवित व्हावी हा योगयोगदेखील भारावून टाकणारा आहे.

' कविता-रती'चा गाडा हाकणारे पुरुषोत्तम पाटील (धुळेकरांचे पुपाजी) स्वत: जातिवंत कवी आहेत. 'अनुष्टुभ' या नियतकालिकाच्या जडणघडणीच्या काळातील संपादनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. काव्यनिर्मिती केवळ पुपाजींचा छंद आहे, असे नव्हे तर, तो त्यांच्या जगण्याचा श्वास आहे, ऑक्सिजन आहे. तरुण पुत्राचे दुदैर्वी निधन, या घटनेचा आघात सहन न झाल्यामुळे पत्नीवर झालेला मानसिक परिणाम, प्राचार्य तसेच प्राध्यापक म्हणून काम करीत असताना आलेले कटू अनुभव या लागोपाठच्या आघातांमुळे पुपाजी कोलमडले नाहीत. या काळात त्यांना विशेष बळ मिळाले ते बा. भ. बोरकर आणि कुसुमाग्रजांच्या सहवासात. पुण्याला र्फग्युसन महाविद्यालयात बी. ए. करीत असताना पुपाजी बोरकरांच्या संपर्कात आले. त्यावेळी पुपाजींच्या कविता सत्यकथेतून प्रसिद्ध होत. शिवाय सुंदर हस्ताक्षराची देणगी होतीच. लेखनिक म्हणून काम करण्यासाठी बोरकरांनी पुपाजींना स्वत:च्या घरीच ठेवून घेतलं. त्यांच्या सहवासात पुपाजींच्या प्रतिभेचा वेलू बहरला. त्यांच्या काव्यात हमखास आढळते ते स्त्री-पुरुष प्रेमाचे, शृंगाराचे आणि विरहाचे चित्रण. खानदेशी जुन्या परंपरेतील स्त्रीचे दर्शन त्यांच्या काव्यात होते. शिवाय माथ्यावरचा पदर, थरारे, काचोळी, उसासे, कंकण, मेंदी, पेटल्या हाताची धग, लाजलाजरे सावरवस्त्र असे काळजात धकधक निर्माण करणारे वर्णनही आढळते.

ज्ञानप्रकाश, माणूस, सत्यकथा, छंद, उगवाई, आलोचना यासारख्या दजेर्दार नियतकालिकांचा साहित्य क्षितिजावरून अस्त झाला. अशी शोकांतिका कविता-रतीची होऊ नये असं वाटणारे अनेक मान्यवर साहित्यिक, जिज्ञासू वाचक आणि चाहते यांची मायेची पाखर पुपाजींना लाभली. त्यामुळेच पुरुषोत्तम पाटलांना 'कविता-रती' जोपासणे शक्य झाले. २५ वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेले कुसुमाग्रज (तीन खंड), वा. रा. कांत, इंदिरा संत, संजीवनी मराठे, बालकवी (दोन खंड), विंदा करंदीकर, बा. सी. मढेर्कर, प्रा. रा. ग. जाधव, प्राचार्य म. सु. पाटील इत्यादी विशेषांक या कवींच्या काव्याविषयी अधिक डोळस आणि अभिनव दृष्टी प्रदान करणारे आहेत. याव्यतिरिक्त 'ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी विशेषांक' आणि 'काव्यचर्चा विशेषांक' हे विशेषांकही कविता-रतीतील काव्यसमीक्षेच्या वेगळेपणाची साक्ष देणारे आहेत. त्यामुळे या विशेषांकांना सांस्कृतिक ठेव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

तळ्यातल्या साउल्या, परिदान इत्यादी कसदार काव्यसंग्रह पुपाजींच्या नावावर आहेत. त्यांच्या या साहित्यसेवेची दखल कविवर्य केशवसुत पुरस्कार आणि बालकवि पुरस्कार प्रदान करण्यात येऊन घेण्यात आली आहे. मात्र ऊठसूठ मराठी प्रेमाचे भरते येणाऱ्या मंडळींनी इंग्रजीऐवजी मराठी पाट्यांसाठी आटापिटा करीत असताना कविता-रतीसारखी वाङ्मयीन नियतकालिके जगविण्यासाठी हातभार लावला तर मराठी अमर राहण्याची पुण्याई त्यांच्या नावावर जमा होऊ शकते. विद्यापीठातील मराठीचे तरुण अध्यापक आणि कवि आशुतोष पाटील यांना पीएच.डी. संशोधनासाठी 'कविता-रती'वर लक्ष केंदित करणे महत्त्वाचे वाटले. काव्यक्षेत्राच्या संक्रमणकाळात कवितेचा सच्चा सूर लावून मराठी कवी, काव्यसमीक्षक, काव्यरसिक, काव्याभ्यासक, काव्यवाचक अशा सगळ्यांनाच चैतन्यमय करून त्यांची काव्याभिरुची अधिक उन्नत करणाऱ्या कविता-रतीचे कार्य मराठी काव्याच्या आणि वाङ्मयीन नियतकालिकांच्यादृष्टीने ऐतिहास स्वरूपाचे आहे, हे प्रा. आशुतोष पाटील यांचेच नव्हे तर खानदेशवासींचे प्रातिनिधिक मत आहे. विशेष म्हणजे यावर सर्वांचे एकमत आहे. (प्रा. पुरुषोत्तम पाटील ०२५६२-२२०१७३, ९३७२०२०१७३)

(महाराष्ट्र टाइम्स_२९ ऑक्टोबर २०१० वरून साभार)

Tuesday, December 7, 2010

'कविता-रती' एका युगाचा काव्यखंड साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास -इंद्रजित भालेराव

धुळे, दि.३०- 'कविता-रती' म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे, अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी साहित्यिक प्रा.पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेवरील प्रेमाचा आणि निष्ठेचा गौरव केला.
प्रा.पाटील यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या 'कविता-रती' या द्वैमासिकाच्या वाटचालीस मंगळवारी, ३० रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त 'कविता-रती' आणि झेड.बी. पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे कविवर्य बा.भ. बोरकर यांच्यावर विशेषांक काढण्यात आला. त्याचे प्रकाशन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झाले. झेड.बी. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.बी.पाटील होते. प्रमुख अतिथी माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख, जयहिद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण साळुंखे होते.
भालेराव म्हणाले की, 'कविता-रती' आणि पुरुषोत्तम पाटील यांच्याबद्दल आपल्या मनात पितृभावना आहे. मी त्यांना 'पृथ्वीवरच्या ईश्वरतेचे पाऊल' मानतो. काही कवी स्वत:ला प्रोजेक्ट करतात. काही कवी आपली कविता प्रोजेक्ट करतात. पण पुरुषोत्तम पाटील हे दुसऱ्याची कविता प्रोजेक्ट करणारे साहित्य क्षेत्रातील एकमेव उदाहरण ठरावे. त्यांच्या कवितेकडे इतरांचे दुर्लक्ष झाले तसे त्यांचे स्वत:चेही दुर्लक्ष झाले. 'कविता-रती'ने माझ्यासारख्या अनेक कवींना मान्यता मिळवून दिली. हे द्वैमासिक म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे. ते एक डॉक्युमेंट आहे. त्यावर अनेक जण संशोधन करू शकतात. युगानुरूप होणारा बदल स्वीकारणारे मासिकच टिकू शकते. भाषेच्या नावाने गळे काढून नव्हे तर कविता-रतीसारख्या साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास होतो. ती टिकते. जगते आणि वाढतेही.
खरे संशोधन विद्यापीठात नव्हे तर विद्यापीठाबाहेर होत असते, या त्यांच्या वाक्यावर सभागृहात खसखस पिकली. त्यातून कुलगुरूही सुटले नाहीत. कवितेला तन-मन आणि धन देणारा दुसरा साहित्यिक शोधून सापडणार नाही, अशी पावतीही त्यांनी दिली.
योगदान समाजासमोर यावे
डॉ.साळुंखे आणि डॉ.देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, आपण सगळे पैशाशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. अशा दुनियेत पुरुषोत्तम पाटलांसारखे उदाहरण विरळेच. त्यांचे योगदान समाजासमोर आले पाहिजे.
उच्चभ्रूंकडून बेदखल
पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक करताना २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. 'कविता-रती' अनेकांमुळे वाढले, टिकले. त्यांचे सहकार्य नाकारता येणार नाही. ३० नोव्हेंबर १९८५ रोजी मुंबईत प्रा.रमेश तेंडुलकरांच्या हस्ते पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. त्याची आठवण त्यांनी ताजी केली. वाटचालीतले अनुभव कथन केले. नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील कवींना आपण जवळून अनुभवले. ग्रामीण भागातील कवींनी आपल्याला अधिक आकर्षित केले. त्यांच्या कविता सदैव टवटवीत वाटतात, असे ते म्हणाले. विशेषांकांविषयी बोलताना ते म्हणाले, कुसुमाग्रजांवर आपण तीन खंड काढले. मात्र उच्चभ्रू साहित्यिक आणि समीक्षकांनी त्याची दखल घेतली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष पाटील यांनी केले
(लोकमत दि.१ डिसेंबर २०१०)

रौप्यमहोत्सवी `कवितारती' : विद्याविलास पाठक


‘कवितारती’ची 25 वर्षाची वाटचाल कोणतेही संकट न येता झाली, असे म्हणता येणार नाही. चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या नियतकालिकाला पु.ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्यासारख्या रसिकांनी आर्थिक मदत केलीच; शिवाय अनेक कवींना आपल्याला मिळालेल्या काव्यविषयक पुरस्कारांची रक्कम कवितारतीसाठी कृतज्ञतेच्या भावनेतून पाठवून दिली. ऐन तारुण्यात असलेल्या मुलाच्या मृत्यूने आलेली उदासीनता आणि या घटनेमुळे पत्नीवर झालेला मानसिक आघात या सा-या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यात कवितारतीनेच त्यांना बळ दिले. म्हणूनच पुपांचा चांगल्या कवितांचा शोध अजूनही एखाद्या व्रतस्थाप्रमाणे सुरूच आहे.


मी एक लहानसं झाड आहे,

फळभाराचा अखेरचा मोसम

संपल्यानंतर वठून जाईन

त्याची एक खिडकी बनवा


माणसाचा मृत्यू अटळ आहे. जिवंतपणी समाजाला देणे शक्य होते ते देऊन झाले, मात्र मृत्यूनंतरीही समाजाला आपला उपयोग व्हावा. आपल्या लाकडापासून बनवलेल्या खिडकीतून आभाळाला गवसणी घालण्याचे बळ माणसाला मिळावे, असा उदात्त विचार मनात येणे आणि तो केवळ मनात न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, हे ज्याला साधते, त्याला कर्मयोगीच म्हणतात. असाच एक कर्मयोगी साहित्याच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या धुळय़ासारख्या शहरात एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे कवितेचा धांडोळा घेतो आहे. पुरुषोत्तम पाटील हे त्यांचे नाव. धुळय़ात आणि त्यांच्या परिचितांत ते पुपायाच नावाने ओळखले जातात. नव्या पिढीली त्यांचे नाव किंवा त्यांच्या कविता कदाचित ठाऊकही नसतील, मात्र जुन्या पिढीला आपल्या भावगितांनी आणि प्रणयरम्य कवितांनी त्यांनी एके काळी रिझविले एवढे मात्र नक्की. त्यांच्या भावगीतांच्या एचएमव्हीने काढलेल्या रेकॉर्ड्स आता कदाचित त्यांच्याकडेही असतील की नाही याची शंका आहे. त्यांच्या कविता मात्र तळय़ातल्या सावल्याआणि परिदानया काव्यसंग्रहामुळे आजही आपल्याला सोबतीला आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुपा पुण्यात आणि तेही फर्गसनसारख्या नावाजलेल्या कॉलेजात. त्या काळात साहित्य संस्कृतीचे माहेरघर अशी पुण्याची ओळख रूढ झालेली होती. पुपांना कवितेची मुळातच मनापासून आवड. त्यांचे हस्ताक्षर तर मोत्याच्या दाण्यासारखे. बोरकर त्या काळात पुण्यातच वास्तव्यास होते. त्यांना लेखनिकाची गरज होती. पुपांनाअसलेली कवितेची आवड, साहित्याचा अभ्यास आणि सुंदर हस्ताक्षर या सा-या बाबी जुळून आल्याने ते बोरकरांचे लेखनिक झाले. बोरकरांनी त्यांना घरातला एक सदस्य अशीच वागणूक दिली आणि त्यांना आपल्या घरीच ठेऊन घेतले. तब्बल तीन वर्षे ते बोरकरांच्या सहवासात होते. बोरकरांच्या सहवासात त्यांची कविता आणि कवितांविषयीचे प्रेम अधिक प्रगल्भ आणि डोळस झाले. बोरकरांप्रमाणेच पुपाही सौंदर्यवादी. ग्रामीण स्त्रीचा साजशृंगार, स्त्री-पुरुषांमधले आकर्षण आणि प्रणयभावना यांचे चित्रण त्यांच्या कवितांतून येते.

84 वर्षाच्या आयुष्यात केवळ चारच पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.तळय़ातल्या सावल्याआणि परिदानहे दोन कवितासंग्रह आणि तुकारामांची काठी’, ‘अमृताच्या ओळीहे लेखांचे संग्रह एवढीच त्यांची साहित्य संपदा. याचा अर्थ त्यांची प्रतिभा मर्यादित होती असे नाही. ते स्वत: एक उत्तम शिक्षक आणि कवितेचे निस्सिम चाहते असल्याने कविता करण्याची क्षमता असलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना घडविण्याचे काम कवितारतीच्या माध्यमातून केले. ते 25 वर्षानंतरही तेवढय़ाच जोमाने आणि जिद्दीने सुरू आहे.

ज्यांनी आपल्याला साहित्याची नवी दृष्टी दिली आणि दिशा दाखविली, त्या कविवर्य बोरकरांच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुपांनी कविता-रतीहे केवळ कवितांना समर्पित केलेले द्वैमासिक सुरू केले. 30 नोव्हेंबर 1985 रोजी प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते कविता-रतीच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. परवाच्या 30 नोव्हेंबरला कविता-रती 25 वर्षाचे झाले. गेली 25 वर्षे केवळ एकाच व्यक्तीने असंख्य अडचणींवर मात करत, कविताविषयक नियतकालिक सुरू ठेवावे, हा एक विक्रमच म्हणायला हवा. जुन्या-नव्या कवींच्या कविता, कवितांची समीक्षा, महत्त्वपूर्ण कवींसंबंधी लेख, त्यांची छायाचित्रांसह माहिती, वैशिष्टय़पूर्ण अवतरणे असा मजकूर असलेले आणि फक्त कवी आणि कविता यांनाच पूर्णत: वाहिलेल्या या नियतकालिकाने आज साहित्यक्षेत्रात मानाचे स्थान निर्माण केले आहे. जळगावातल्या नारायण नरसिंह ऊर्फ नानासाहेब फडणीस यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणा-या काव्यरत्नावलीने घालून दिलेली 48 वर्षाची परंपरा पुपांनी कविता-रतीद्वारे जपली आहे. जुन्या-नव्याचा दुवा सांधण्याचे काम कविता-रतीने केले आहे. या काळात कविता-रतीचे कुसुमाग्रज विषेशांक(दोन खंड), बालकवी विशेषांक(दोन खंड), वा. रा. कांत इंदिरा संत, तसेच ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी, काव्यचर्चा असे अनेक विशेषांक प्रकाशित झाले. केवळ कविता आणि कवी यांच्याविषयीची चर्चा एवढय़ापुरते आपले क्षेत्र मर्यादित न ठेवता पुपांनी अनेक नव्या कवींना कविता-रतीद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. नवोदितांच्या कविता पुपा आजही आस्थेने वाचतात. त्याचे रसग्रहण करण्यात ते मनापासून रमतात. कवितेत रसभंग होणारे जे काही त्यांना आढळते, त्याबाबत कवीशी चर्चा करून मार्गदर्शन करण्याचे काम ते आवडीने करतात. त्यांच्याकडे येणा-या नवोदितांच्या कविततील ढोबळ चुका वडिलकीच्या नात्याने संबंधित कवीच्या नजरेस आणून देतात. शब्दांची अचूक निवड आणि योग्य वापर यावर ते आग्रही असतात. नामवंत कवींबरोबरच कविता-रतीने आजपर्यंत 575 कवींच्या सुमारे 2800-2900 कवितांना प्रकाशात आणले आहे. कुसुमाग्रज, इंदिरा संत यांच्यावर पुपांची नितांत भक्ती. कुसुमाग्रजही त्यांना आपले मानत. त्यांचा नियमित पत्रव्यवहारही असे. एकदा पत्र लिहिताना कुसुमाग्रजांना पुपा धुळय़ात राहात असलेल्या रस्त्याचे नाव आठवत नव्हते. त्यांनी पुपांचा पत्ता लिहिताना सरळ कविता रस्ताअसे लिहून टाकले. तेव्हापासून पुपांचे घर असलेला वाडीभोकर रस्ता कविता रस्ताम्हणूनच ओळखला जात होता. नंतर त्याला एका शिक्षणतज्ज्ञाचे नाव देण्यात आले हा भाग निराळा. चांगल्या कवितेचा शोध घेण्याच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या नियतकालिकाला पुल देशपांडे, सुनीताबाई यांच्यासारख्या रसिकांनी आर्थिक मदत केलीच; शिवाय अनेक कवींनी आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांची रक्कम कविता-रतीसाठी दिली. ऐन तारुण्यात असलेल्या मुलाच्या मृत्यूने आलेली उदासीनता आणि या घटनेमुळे पत्नीवर झालेला मानसिक आघात या सा-या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यात कविता-रतीनेच त्यांना बळ दिले. त्यांना हल्ली ऐकू कमी येते. पायाच्या दुखापतीने फिरण्यावर बंधन येत असले तरी कवितेचा शोध पूर्वीच्याच उमेदीने सुरू आहे.

कवितेतील वैशिष्टय़पूर्ण अवतरणे हा त्यांचा वीकपॉइंट’. त्यामुळेच पुण्याच्या रविवारच्या केसरी अमृताच्या ओळीया नावाने कवितेतल्या अशा वैशिष्टय़पूर्ण अवतरणांवर त्यांनी वर्षभर लेखमाला चालविली. त्या लेखमालेच्याच नावाने प्रसिद्ध झालेले पुस्तक हेच त्यांचे अलीकडील ताजे पुस्तक.

पुपांना तुकारामाची काठीया स्तंभलेखनाच्या संकलित पुस्तकास अमळणेरच्या चेताश्री प्रकाशनाचा मुक्ताई पुरस्कारतर कविता-रतीला 2003-04 ची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्तीमिळाली. महाबळेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवितेवर अव्याभिचारी निष्ठा असलेल्या पुपांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते; ‘मी निराशावादी नाही, जगात कटू, वाईट खूप काही घडत असते, मात्र त्यातून मनाला निराशा येऊ दिली नाही.हे केवळ विचारच नव्हते तर तो त्यांनी धर्म मानला. म्हणूनच वादळवा-याला तोंड देत, उनाड पाऊस अंगावर घेत कवितेचे हे झाड सहस्त्रचंद्र दर्शनानंतरही ताठ मानेने उभे आहे.


(दै.प्रहार_ दि.४ डिसेंबर २०१० वरून साभार)

Monday, November 22, 2010

`कविता-रती’ ची पंचवीस वर्षे

ऑस्कर पुरस्कार प्राप्त ख्यातनाम गीतकार, कवी, दिग्दर्शक गुलजार साहेबांनी एक पत्र लिहिलं. त्यातल्या दोन ओळी अशा होत्या-

‘A full magazine of poetry in itself is a great achievement.
... May I subscribe for the magazine?'

गुलजार साहेबांच्या ह्या दोनओळी होत्या‘कविता-रती’ ह्या मराठी द्वैमासिकाबद्दल. आणि ते पत्र लिहिलं होतं ’कविता-रती’ चे संपादक प्रा. पुरुषोत्तम पाटील ह्यांना.
’कविता-रती’चा वर्गणीदार मला होता येईल का? हे गुलजार साहेबाचं विचारणं म्हणजेच ’कविता-रती’ ह्या वाङ्मयीन नियतकालिक चालविणे हीच खरं तर फार मोठी जोखिम आहे. त्यातही केवळ कवितेला वाहिलेले नियतकालिक नेटाने सुरू ठेवणे ही गोष्ट आणखी कठीण. प्रकाशनाचा कालावधी थोडा मागेपुढे होत असला तरी त्यातले सातत्य टिकवून ठेवणे सोपे नाही. सतीचा वसा घेतल्यासारखे हे व्रत आहे. अशा व्रतस्थपणे गेली पंचवीस वर्षे ‘कविता-रती’चे अंक धुळ्यावरुन निघताहेत आणि ह्या द्वैमासिकाचे संपादक, मुद्रक, प्रकाशक आहेत कविवर्य पुरुषोत्तम पाटील.
कवितेचा आणि पर्यायाने मानवी जीवनातला ‘अर्थ’ कायम रहावा म्हणून ’कविता-रती’ चे अर्थशास्त्र कु्ठल्याही शासकीय अनुदानाच्या कुबड्याविना आपल्या निवृत्त खांद्यांवर त्यांनी समर्थपणे पेलले. काट्याकुट्याची वाट वारंवार साफसुफ करीत तिला राजमार्गाचे वैभव प्राप्त करून दिले. मरा्ठी कवितेच्या इतिहासाला ही नोंद विसरता येणार नाही. मरा्ठी कविता त्यांची कायम ऋणी आहे. कृतज्ञ आहे.
खानदेशाला तशी साहित्याची समृद्ध परंपरा आहे.जीवनाचे रोकडे तत्वज्ञान सांगणार्‍या‍‍‌‌ बहिणाबाई चौधरी खानदेशातल्याच. ‘काव्य रत्नावली’ नावाचे मासिक ४८ वर्षे नेटाने चालविणारे नानासाहेब फडणीस आपल्या जळगावचे.मराठी नवकवितेचे जनक असलेल्या कविवर्य बा. सी. मर्ढेकरांचा जन्म खानदेशातल्या फैजपूरचा. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले ते धुळ्याला. मर्ढेकरांची दैवत असलेल्या बालकवींनी आपली पहिली कविता लिहिली ती खानदेशातील नवापूरला.
अशी समृद्ध वाङ्मयीन परंपरा लाभलेल्या खानदेशातील धुळे हे तसे आडवळणाचे गाव. अवतीभवतीच्या परिसर तसा आदिवासी बहुल लोकसंख्येचा. अशा ठिकाणाहून १९८५ ला ’कविता-रती’ हे मराठी कवितेला वाहिलेले द्वैमासिक काढले ते पुरुषोत्तम पाटील यांनी. आणि ते पुढे अत्यंत जिद्दीने चालविलेही. वाङ्मयीन नियतकालिकांच्या दृष्टीने तो कालखंड अतिशय खडतर होता. १९८४ ला ‘सत्यकथा’ नुकतेच बंद पडले होते. पुढे १९९० ला ‘अभिरुची’ आणि ९२-९३ च्या सुमारास ‘समुचित’ चे प्रकाशन थांबले. ’अस्मितादर्श’चा अपवाद वगळता जवळपास महत्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांचे अवतार कार्य संपुष्टात आलेले होते. या कालखंडात ‘कविता रती’ ला जिवंत ठेवले ते पुरुषोत्तम पाटील यांच्या संयमी ध्येयनिष्ठेने. महाराष्ट्रातल्या खेड्या-पाड्यातल्या नव्या-जुन्या पिढीच्या कवितांचे स्वागत केले ते ’कविता-रती’ने. आणि त्याचे अधिष्ठान होते पुरुषोत्तम पाटील यांचे साक्षेपी आणि अनाग्रही संपादन.
२०१० हे ‘कविता-रती’चे रौप्यमहोत्सवी वर्ष.बरोबर पंचवीस वर्षांपूर्वी ३० नोव्हेंबर १९८५ ला ‘कविता-रती’चा पहिला अंक प्रकाशित झाला.३० नोव्हेंबर हा कै.कविवर्य बा.भ.बोरकरांचा जन्मदिवस.कविवर्य बा.भ.बोरकरांचे लेखनिक म्हणून काम करताना पुरुषोत्तम पाटील ह्यांना बोरकरांचा सहवास लाभला.काव्य-शास्त्र-विनोदात या गुरू-शिष्यांच्या अनेक रात्री रंगल्या. काव्यचर्चेत अनेक दिवस झिंगले.बोरकरांच्या सौंदर्यवादी सानिध्यात पुरुषोत्तम पाटील ह्यांची काव्य विषयक जाण अधिक परिपक्व होत गेली. कवितेच्या अमृताचं हे दान पाटीलांच्या दोन हातांच्या ओंजळीत सामावणार नव्हतं. ते संपूर्ण महाराष्ट्राच्या भव्य ओंजळीत घालण्यासाठी ते उचंबळून येत होतं. उतराई होऊ बघत होतं. आणि त्यातून जन्म झाला ‘कविता-रती’चा. कै. कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ काव्य, काव्यविचार, काव्य समीक्षा व कविविमर्श यांनाच केवळ वाहिलेले द्वैमासिक म्हणजे ’कविता रती’. मराठी कवितेच्या इतिहासात इतकी एकनिष्ठ आणि एवढी सर्वश्रेष्ठ कृतज्ञता शोधूनही सापडणार नाही.
प्रत्येक नवी पिढी ही अगोदरच्या पिढीच्या खांद्यावर उभी असल्याने तिला अधिक उंची प्राप्त होते. हे कोणत्याही नव्या पिढीने विसरता कामा नये. ही श्रद्धाच मानवी जीवनाला अधिक सुंदर करीत असते. काव्यसौंदर्य प्रकट करणारे ते गर्भगृह असते. परंपरेची नाळ अशीच मागे मागे जोडल्या जात असते. आणि पुढे पुढे वाढतही असते. ‘कविता रती’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
परवा ३० नोव्हें. २०१० ला ‘कविता रती’चा रौप्य महोत्सवी अंक बा. भ. बोरकर विशेषांक म्हणून प्रकाशित झाला. या अंकाला अर्थ सहाय्य करण्यासाठी संपादकांनी केलेल्या आवाहनाला संपूर्ण महाराष्ट्रातून जो प्रतिसाद मिळाला तो भारावून टाकणारा आहे. नव्या पिढीतल्या अनेक कवींनी आपल्या पुरस्काराच्या रकमा कृतज्ञतानिधी म्हणून या सत्कार्याला दान केल्या. आणि सिद्ध केले की, या पिढीलाही कृतज्ञतेची जाण आहे. आणि आपल्या इतिहासदत्त कर्तृत्वाचे भानही आहे.
‘कविता रती’च्या वाङ्मयीन योगदानाचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे मांडता येईल. गेल्या पंचवीस वर्षात ‘कविता रती’ने १३० अंक प्रकाशित केले. यापैकी काही दिवाळी अंक हे विशेषांक म्हणून प्रकाशित केलेले आहेत. त्यात प्रामुख्याने कुसुमाग्रज, कांत, इंदिरा संत, बालकवी, ज्ञानेश्वरी, काव्यचर्चा, विंदा करंदीकर, म. सु. पाटील, मर्ढेकर आणि आता बा. भ. बोरकर यांच्या वरील विशेषांकाचा समावेश आहे. ५७५ कवींच्या २८८७ कविता गेल्या पंचवीस वर्षांत ‘कविता रती’ मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. काव्यांची रसग्रहणे, आस्वाद, समीक्षा, मर्मग्रहणे, काव्य चर्चा, संपादकीय इत्यादी अंगांनी कवितेला व्यक्त करणार्‍या मजकुराची ६००० हून अधिक पृष्ठे अभ्यासकांना उपलब्ध करून देणार्‍या ‘कविता रती’ बद्दल मराठी रसिकांच्या मनात आदराचे स्थान आहे.
‘कविता ही बहुरुपिणी आहे’ हे ब्रीद मनात जपत पुरुषोत्तम पाटीलांनी ‘कविता रती’चे संपादन केले. नावीन्याचा हव्यास, विशिष्ट प्रकारची बांधिलकी,आदिवासी, ग्रामीण, महानगरी, मुक्तछंद वृत्तबद्ध अशी कु्ठलीच कुंपणे न मानता गेल्या चार-पाच पिढ्यांच्या उत्तमोत्तम कविता ‘कविता रती’ ने प्रकाशित केल्या. त्यामुळे मराठी कवितेच्या मुख्यधारेचे पात्र अधिक विशाल आणि व्यापक झाले. अमुक अमुक प्रकारची म्हणजेच कविता असे साचे जे गेल्या काही वर्षात रूढ होऊ पाहत होते ते विधायक जबाबदारीने ‘कविता रती’ने मोडून काढले आणि त्यावर उत्तम संस्कारही केले.
रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ‘कविता रती’ चा इंटरनेट ब्लॉगही सुरू करण्यात आला आहे. आता जगाच्या कोण्याही कोपर्‍यातून मराठी कवितेवर प्रेम करणार्‍या माणसाला ‘कविता रती’ चे अंक वाचता येतील, अभ्यासता येतील. संगणक, इ-बुक रिडर, आणि मोबाईल हँडसेट मध्ये सुद्धा कविता रती’ चे अंक डिजिटल स्वरूपात संग्रही ठेवता येतील. एवढा अनमोल ठेवा आपल्या हवाली करणार्‍या त्र्यांशी वर्षाच्या पुरुषोत्तम पाटील ह्यांचे आपण तमाम मराठी रसिकांच्या वतीने अभिष्टचिंतन करूया. आणि ’कविता रती’ च्या रौप्य महोत्सवी काव्ययात्रेला शुभेच्छा देऊया त्याही गुलजारजींच्या शब्दात-

"हर मोड पे मैने नज्म खडी कर रखी है!
थक जाओ अगर-
और तुम्हे जरुरत पड जाये,
इक नज्म की उँगली थाम के वापस आ जाना!’

- श्रीकृष्ण राऊत
_____________________________________

वरील लेख श्रीकृष्ण राऊत ह्यांच्या आवाजात ऐका :

(आकाशवाणी जळगावच्या सौजन्याने)