अंक दिसत नसल्यास...

खालील लिंकवरून flashplayer फ्री डाऊनलोड करा.इन्स्टॉल करा. http://downloadflashplayer.org/ अंक दिसू लागेल.

झूम करून वाचण्याकरिता अंकावर दोनदा क्लीक करा :

___________________________________________________

Tuesday, December 7, 2010

'कविता-रती' एका युगाचा काव्यखंड साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास -इंद्रजित भालेराव

धुळे, दि.३०- 'कविता-रती' म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे, अशा शब्दात कवी इंद्रजित भालेराव यांनी साहित्यिक प्रा.पुरुषोत्तम पाटील यांच्या कवितेवरील प्रेमाचा आणि निष्ठेचा गौरव केला.
प्रा.पाटील यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या 'कविता-रती' या द्वैमासिकाच्या वाटचालीस मंगळवारी, ३० रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त 'कविता-रती' आणि झेड.बी. पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे कविवर्य बा.भ. बोरकर यांच्यावर विशेषांक काढण्यात आला. त्याचे प्रकाशन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झाले. झेड.बी. पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.बी.पाटील होते. प्रमुख अतिथी माजीमंत्री डॉ.हेमंत देशमुख, जयहिद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण साळुंखे होते.
भालेराव म्हणाले की, 'कविता-रती' आणि पुरुषोत्तम पाटील यांच्याबद्दल आपल्या मनात पितृभावना आहे. मी त्यांना 'पृथ्वीवरच्या ईश्वरतेचे पाऊल' मानतो. काही कवी स्वत:ला प्रोजेक्ट करतात. काही कवी आपली कविता प्रोजेक्ट करतात. पण पुरुषोत्तम पाटील हे दुसऱ्याची कविता प्रोजेक्ट करणारे साहित्य क्षेत्रातील एकमेव उदाहरण ठरावे. त्यांच्या कवितेकडे इतरांचे दुर्लक्ष झाले तसे त्यांचे स्वत:चेही दुर्लक्ष झाले. 'कविता-रती'ने माझ्यासारख्या अनेक कवींना मान्यता मिळवून दिली. हे द्वैमासिक म्हणजे एका युगाचा काव्यखंड आहे. ते एक डॉक्युमेंट आहे. त्यावर अनेक जण संशोधन करू शकतात. युगानुरूप होणारा बदल स्वीकारणारे मासिकच टिकू शकते. भाषेच्या नावाने गळे काढून नव्हे तर कविता-रतीसारख्या साहित्य साधनेतूनच भाषेचा विकास होतो. ती टिकते. जगते आणि वाढतेही.
खरे संशोधन विद्यापीठात नव्हे तर विद्यापीठाबाहेर होत असते, या त्यांच्या वाक्यावर सभागृहात खसखस पिकली. त्यातून कुलगुरूही सुटले नाहीत. कवितेला तन-मन आणि धन देणारा दुसरा साहित्यिक शोधून सापडणार नाही, अशी पावतीही त्यांनी दिली.
योगदान समाजासमोर यावे
डॉ.साळुंखे आणि डॉ.देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.पाटील म्हणाले, आपण सगळे पैशाशिवाय दुसरा विचार करू शकत नाही. अशा दुनियेत पुरुषोत्तम पाटलांसारखे उदाहरण विरळेच. त्यांचे योगदान समाजासमोर आले पाहिजे.
उच्चभ्रूंकडून बेदखल
पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक करताना २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. 'कविता-रती' अनेकांमुळे वाढले, टिकले. त्यांचे सहकार्य नाकारता येणार नाही. ३० नोव्हेंबर १९८५ रोजी मुंबईत प्रा.रमेश तेंडुलकरांच्या हस्ते पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले. त्याची आठवण त्यांनी ताजी केली. वाटचालीतले अनुभव कथन केले. नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील कवींना आपण जवळून अनुभवले. ग्रामीण भागातील कवींनी आपल्याला अधिक आकर्षित केले. त्यांच्या कविता सदैव टवटवीत वाटतात, असे ते म्हणाले. विशेषांकांविषयी बोलताना ते म्हणाले, कुसुमाग्रजांवर आपण तीन खंड काढले. मात्र उच्चभ्रू साहित्यिक आणि समीक्षकांनी त्याची दखल घेतली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष पाटील यांनी केले
(लोकमत दि.१ डिसेंबर २०१०)

No comments:

Post a Comment